Wednesday, October 8, 2014

शोध…



दाटलेलं आभाळ आज
थेंब थेंब ठिबकत होतं…
आयुष्याच्या शिवारात
हळू हळू झिरपत होतं…

काळ्या भोर मातीमधल्या
संवेदना शुष्क झाल्या होत्या…
जीवनातील भावना सगळ्या  
एक एक करून मेल्या होत्या…

क्षणोक्षणी समोर उभे
दुःखांचे डोंगर दिसत होते… 
ओकं बोकं शरीर अन
सुख सुकलेलं भासत होते…

टिकाव खोरे कुदळ घेऊन
भूतकाळ मी खणत होतो…
हरवलेल्या स्वप्नांची
मुळं मी शोधत होतो… 

खूप खोल जमिनीखाली
भग्न अवशेष सापडले होते…
थरांवर थर दुःखांचे
सुख खाली गाडले होते…

भाळावर त्याच्या फुंकर घालत
हलकेच मी चुंबत राहिलो…
धडधडत्या श्वासामधला
प्राणवायू मी हुंगत राहिलो…

त्या थेंबांनी दिधले जीवन
पुनःजन्म झाला माझा…
अलगद उचलून
छाती कवटाळला
भूलोकांतील देह माझा…



मुंबई.                                                  सुभाष जिरंगे

दिनांक :-  १७-४-२०१४